श्रीमती एम. यांच्यासाठी तो एक अगदी नेहमीचा दिवस होता. अचानक त्यांच्या फोनवर WhatsApp चा व्हेरिफिकेशन कोड — सहा अंकी क्रमांक आला. त्यांनी तो मागवलेलाच नव्हता. लगेचच WhatsApp वर त्यांच्या एका विश्वासू कॉन्टॅक्ट कडून संदेश आला:
“मी चुकून तुम्हाला एक सहा अंकी कोड पाठवला आहे. कृपया तो मला परत पाठवाल का?”
त्या क्षणी त्या दुसऱ्या एका महत्त्वाच्या कॉलवर व्यस्त होत्या. फार विचार न करता घाईघाईने त्यांनी तो कोड कॉपी करून पाठवला. काही सेकंदांतच त्यांचा WhatsApp बंद पडला. त्या लॉग आऊट झाल्या होत्या. आणि त्या परत लॉगिन करण्याआधीच हॅकरने त्यांचा अकाऊंट ताब्यात घेतला.
पुढे जे घडले ते आणखीच भयानक होते — हॅकरने त्यांच्या संपर्कातील लोकांना आपण अडचणीत असल्याचे सांगून त्यांच्याकडून पैसे मागायला सुरुवात केली. हा संदेश थेट श्रीमती एम. यांच्या नंबरवरून आल्याने लोक घाबरले आणि काळजीत पडले. काहींनी पैसे पाठवण्याचाही विचार केला.
लगेच झालेले नुकसान
श्रीमती एम. यांना आपले WhatsApp चालत नाही हे लक्षात आल्यावर त्यांनी फोन करून मला हे सांगितले. मी लगेच आमच्या ग्रुप्समध्ये पोस्ट करून टाकले की त्यांचा WhatsApp हॅक झाला आहे आणि त्यांच्या नंबरवरून आलेल्या पैशांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करावे, आणि कोड ची मागणी आली तरी कोड देऊ नये.
दुर्दैवाने, हॅकर (त्याला आपण श्री. एच. म्हणूया) फारच वेगाने काम करत होता. त्याने माझे अलर्ट डिलीट केले आणि मला काही गटांतून बाहेरही काढले.
खरे तर माझी जरा चूकच झाली. ज्या गटांमध्ये मी अॅडमिन होतो तिथून श्रीमती एम. यांचा नंबर मी सर्वात आधी काढायला हवा होता आणि मगच ग्रुपवर इशारा द्यायला हवा होता. म्हणजे हॅकरला पुढे ग्रुपचा ताबा मिळाला नसता.
तुमच्या कॉन्टॅक्ट्स पैकी कुणाचे WhatsApp हॅक झाल्यास काय करावे
ज्या गटांमध्ये तुम्ही अॅडमिन आहात, तिथून हॅक झालेला तो नंबर काढून टाका.
जर "हा अॅडमिन असल्याने त्याला काढता येत नाही" अशी अडचण आली, तर इतर अॅडमिनना सांगून काढून टाकायला सांगा.
ग्रुप सदस्यांना आणि इतर कॉन्टॅक्ट्सना वैयक्तिकरीत्या कळवा: “या नंबरवरून आलेल्या पैशांच्या मागण्या स्वीकारू नका. WhatsApp हॅक झाले आहे.” (श्रीमती एम. यांचा नंबर).
हॅक झालेला नंबर ब्लॉक आणि रिपोर्ट करा.
गटाच्या चॅट मध्ये महत्वाची माहिती असेल, तर Group Settings > Export Chat करून ईमेलवर सेव्ह करून ठेवा.
अॅडमिनने संवेदनशील माहिती असलेले मेसेज डिलीट करणे आवश्यक आहे.
श्रीमती एम. यांच्या बाबतीत धोका मोठा होता. त्या दृष्टीबाधित विद्यार्थ्यांना शैक्षणिक ऑडिओ पुस्तके पुरवणाऱ्या स्वयंसेवी गटाच्या संचालक होत्या. सर्वांचा त्यांच्यावर गाढ विश्वास होता. दुर्दैवाने, ह्या विश्वासामुळे काही जणांनी हॅकरला पैसेही ट्रान्सफर केले. काहींनी थेट फोन करून खात्री करून घेतली आणि त्यामुळे त्यांचे पैसे वाचले.
श्रीमती एम. अनेक गटांमध्ये सक्रिय असल्यामुळे हॅकरला एका फार मोठ्या नेटवर्कमध्ये प्रवेश मिळाला. त्याने OTP आणि पैसे मागणारे शेकडो मेसेज सर्वत्र पाठवले.
व्हॉट्सअॅप् हॅकिंग कसे होते?
व्हेरिफिकेशन कोडचा सापळा
प्रत्येक WhatsApp खाते एका फोन नंबरशी जोडलेले असते.
- नवीन
डिव्हाइसवर WhatsApp लॉगिन
करताना, एक सहा अंकी
कोड WhatsAppवर येतो.
हा कोड कधीही कोणाला देऊ नका.
हॅकर हा कोड देण्यासाठी आपल्याला जाळ्यात ओढतो. आणि मग खात्यावर पूर्ण ताबा घेतो.
![]() |
हा कोड कुणालाही देऊ नये! |
विश्वासू संपर्काची फसवणूक
हॅकर बहुधा आधीच हॅक झालेल्या एखाद्या कॉन्टॅक्टच्या नंबरवरून मेसेज पाठवतो.
पाठवणाऱ्याचे नाव ओळखीचे दिसल्याने लोक सहज फसतात.
आर्थिक फसवणूक
खाते हॅक झाल्यावर, हॅकर त्या व्यक्तीच्या ओळखीच्या लोकांना पैसे मागतो.
बहुधा "अडचणीत असल्याची परिस्थिती" सांगितली जाते.
पैसे मनी म्युलकडे जातात (हॅकरच्या वतीने पैशाचे व्यवहार करणारे इसम) आणि त्यांचा माग काढणे अवघड असते.
फसवणूक टाळण्यासाठी काय करावे
तुमचा व्हेरिफिकेशन कोड कधीही शेअर करू नका
WhatsApp चा सहा अंकी कोड हा तुमच्या ATM पिनइतकाच गोपनीय आहे.
WhatsApp कधीही तुमच्याकडे हा कोड मागणार नाही. त्यामुळे हा कोड कुणीही मागितला तरी देऊ नका.
दोन-स्तरीय सुरक्षा सक्षम करा (two step verification)
WhatsApp मध्ये जास्तीची सुरक्षा करण्याची सोय आहे: सहा अंकी पिन + ईमेल पत्ता.
हे करण्यासाठी:
Settings > Account > Two-step verification > Enable
पिन घाला आणि नीट लक्षात ठेवा किंवा लिहून ठेवा. तो फक्त तुम्हालाच माहिती असू द्या.
Email address देऊन authenticate / verify करा
अडचणीचा बहाणा करून केलेल्या पैशांच्या मागण्यांबाबत सावध रहा
एखाद्या मित्राने व्हॅट्सॅप्प वर पैसे मागितले तर त्याला फोन करून खात्री करून घ्या.
WhatsApp कॉल न लागल्यास मोबाईल नंबरवर कॉल करा.
कधीही फोनवर कोणालाही, कुठलाही कोड देऊ नका.
खाते हॅक झाल्यास त्वरित पुढील कृती करा-
WhatsApp पुन्हा इन्स्टॉल करून तुमच्या नंबरवरून लॉगिन करा.
support@whatsapp.com वर रिपोर्ट करा.
स्थानिक सायबर क्राईम सेलला कळवा.
कॉन्टॅक्ट्सना थेट फोन करून माहिती द्या.
तुमचा नंबर सर्वांनी ब्लॉक व रिपोर्ट करावा असे सांगा.
Report करताना “Hacked for Money Fraud” असा स्पष्ट उल्लेख करा.
थोडक्यात...
डिजिटल जगात सहजासहजी विश्वास ठेवणे किती धोक्याचे आहे श्रीमती एम. यांच्या अनुभवाने दाखवून दिले. केवळ एक कोड शेअर केल्याने हॅकरला संपूर्ण WhatsApp ताब्यात घेता आले आणि त्याने अत्यंत थंड डोक्याने अनेकांचे नुकसान केले.
त्याहून वाईट म्हणजे ही फसवणूक अनेक गटांमध्ये पसरली आणि ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थी यांच्यापर्यंत पोहोचली.
ह्यातले तात्पर्य स्पष्ट आहे:
व्हेरिफिकेशन कोड शेअर करू नका.
दोन-स्तरीय सुरक्षा सुरू करा.
हॅक झाल्यास त्वरित कृती करा.
आजच्या वेगवान डिजिटल जगात सावधगिरी हीच खरी सुरक्षा आहे.
तुमचे मत किंवा माहिती असल्यास ती कृपया कमेंटमध्ये सांगा. साइन-अपची गरज नाही, आणि तुमची वैयक्तिक माहिती इथे सेव्ह केली जाणार नाही.