Thursday, July 10, 2025

कहाणी निळ्या कॉटची -By अश्विनी मराठे - A Tale of our Blue Baby Cot - by Ashwini Marathe

 

 



आम्हाला पहिली मुलगी झाली तेव्हा आमचं पोस्टिंग, रेल्वे खातं सोडून फार कुणाला माहीत नसलेल्या एका छोट्याश्या गावी होतं. हे चिमुकलं गाव, तामिळनाडू मधलं एक मुख्य जंक्शन आहे आणि तिथे नौदलाचा तळ आहे, दुसर्‍या महायुद्धाच्या काळातला एक प्राचीन रनवे आहे. गाव अगदी गजबजलेलं असलं तरी खेडंच होतं. तिथे अनेक गोष्टी मिळणार नाहीत हे माहीत होतं.

एक महिन्याच्या बाळाला घेऊन ह्या पोस्टिंगच्या गावी जाताना फर्स्ट क्लासच्या डब्यातून बाळ-बाळंतीण आणि बाळाची आजी, दोन ट्रंका (त्यात हमखास लागणार्‍या, लागू शकणार्‍या आणि अजिबात गरज नसलेल्या अनेक लहानमोठ्या गोष्टी), सूटकेसेस, कपडे वाळत घालायचा स्टँड (तो इथूनच न्यावा लागतो ना!) एवढा मोठा लवाजमा गेल्यानं त्यात आणखी पाळणा नेण्याची इच्छा दाबून टाकावी लागली होती. त्यामुळे सुरुवातीचे काही दिवस बाळ आणि बाळाचे आईवडील लायनीनं झोपत असत. 

नवऱ्यानं प्रेमानं आणून दिलेलं 'बेबी अँड चाइल्ड केअर' हे डॉ. स्पॉक चं जाडजूड आणि रंजक पुस्तक वाचलेलं असल्यानं बाळाला स्वतंत्र झोपवण्याची आवश्यकता आम्हाला पटली होती. पण स्पॉक म्हणतो त्याप्रमाणे तिला पलीकडच्या खोलीत निजवून खोलीचं दार बंद करून निवांत झोपायला मात्र आमचं भारतीय मन तयार नव्हतं. आता ह्या गावात पाळणा कुठे शोधणार? त्यापेक्षा एक बेबी कॉट तयार करून घ्यावी अशी नामी कल्पना सुचली.
मग काय, बाळीचे बाबा सुताराच्या शोधाला लागले आणि आई कागद पेन्सिल घेऊन कॉटचं डिझाईन बनवायला बसली. आत्ता होतेय कॉट तयार, आहे काय अन् नाही काय! 

बाळाचा बिछाना सव्वादोन - अडीच फुटाच्या पातळीत, त्याखाली कपड्यांसाठी ड्रॉवर्स. बिछान्याला चारी बाजूंनी चोवीस इंच उंच कठडे, त्यातला पुढचा कठडा वर - खाली करता यावा म्हणून ट्रॅक आणि खिट्ट्यांची सोय. आदर्श कॉटचं आदर्श डिझाईन तयार झालं. 

सुतारही सापडला. नौदलाच्या बेस मध्ये तात्पुरता कामाला असलेला एक माणूस. त्यानं आपलं नाव 'सिंग' असं सांगितलं. तामिळनाडू मधला माणूस 'सिंग' कसा हे एक कोडंच होतं. 

सिंगनं त्याच्या ड्यूटी नंतरच्या फावल्या वेळात डिझाईनप्रमाणे कामाला सुरुवात केली. आमच्या गॅरेज मध्ये काम आरामात सुरू होतं. जो सांगाडा उभा राहत होता, त्याच्या रेषा समांतर वाटेनात. पुरेशी शालेय भूमिती लक्षात असल्यानं आयत आणि समांतर भुज चौकोन यांतला फरक आम्हांला कळत होता, पण सिंग? त्याला ही गडबड दाखवून दिली तेव्हा तो म्हणाला, "हो जाएगा साब. रंधा मार देंगे!" हे अजब उत्तर ऐकून आम्ही चक्रावून गेलो पण पुढे ह्या उत्तराची सवय होऊन गेली. ह्या गृहस्थाला कुठलाही प्रॉब्लेम सांगितला की त्याचं हेच उत्तर असे. 
"ड्रॉवर खूप लहान झाला!" - "रंधा मार देंगे!" 
"खिट्टी नीट लागत नाही रे!" - "रंधा मार देंगे!"
"कॉट ची उंची कमी झाली आहे!!" - "रंधा मार देंगे!" 
सुरुवातीला हतबल होणारे आम्ही पुढेपुढे हे उत्तर गृहीत धरून चालू लागलो. 

सिंगला मिळणारा फावला वेळ, बाजारात सामान उपलब्ध असण्याची शक्यता, भारताच्या पूर्व किनार्‍या जवळच्या  ह्या गांवात लौकर पडणारा अंधार हे सर्व लक्षात घेता कॉटचं काम पंचवार्षिक योजनेच्या गतीनं सुरू होतं. त्यातच एक प्रश्न उभा ठाकला - कॉटच्या कठड्यासाठी लागणारे गज कुठून मिळवायचे? सिंगचं सुतारकामातलं अतीव कौशल्य पाहता तो स्वतः काही गुळगुळीत लाकडी गज तयार करणार नव्हता. आणि गजांना पर्याय नव्हता. 

एके दिवशी बाळाच्या कपड्यांसाठी कापड खरेदी करताना अचानक लक्षात आलं की कापडाच्या गुंडाळ्या विकायला ठेवलेल्या असतात त्याच्या आत लाकडी दांड्या असतात, त्या चालतील की आपल्याला! पण मनात आलं आणि सांगून टाकलं असं प्रकरण नव्हतं. थोडी इंग्रजी, मोडकी तोडकी तामिळ आणि खूपसे हातवारे, शिवाय बाळाकडे वारंवार अंगुलीनिर्देश अशी सर्व प्रकारची संवादकौशल्यं वापरल्यावर दुकानदाराला शेवटी एकदाची आमची मागणी कळली. मग मात्र त्यानं तोंडभर हसून त्या दांड्या मोकळ्या होतील तसतशा देण्याचं कबूल केलं. साधारण महिनाभरानं त्यानं पुरेश्या दांड्या आम्हाला विनामूल्य दिल्या. आता सिंग, कॉट, दांड्या आणि रंधा ही चौकडी गॅरेज मध्ये दिसू लागली. मध्यंतरी कधीतरी आपलं नाव खरंतर श्रीनिवास आहे असं सिंगनं आम्हाला विश्वासात घेऊन सांगितलं होतं, पण आमच्यासाठी तो कायम 'सिंग'च राहिला. 

आतापर्यंत आमची राजकन्या उभी रहायला लागली होती. ह्या वेगानं काम चालू राहिलं तर कॉट तयार होईपर्यंत त्याचं अभ्यासाचं टेबल बनवायला लागेल अशी शक्यता दिसू लागली. पण आमची ही भीती खोटी ठरवत, सिंगदयेनं तिच्या पहिल्या वाढदिवसाच्या आत कॉट तयार झाली. सुंदर फिक्या निळ्या रंगाचं ते धूड आमच्या खोलीत स्थानापन्न झालं आणि आम्ही धन्य धन्य झालो! बेटीला त्या मऊमऊ बिछान्यात झोपवायला आम्ही अगदी आतुर झालो. पण बेटीला दोन जित्याजागत्या जिवांच्या मध्ये उबेत झोपायची चटक लागली होती. तिला कॉट मधला कारावास मुळीच सहन होईना. त्यातून व्यक्तिस्वातंत्र्याची संकल्पना आणि आपले अधिकार मिळविण्याच्या पद्धती तिला तोवर चांगल्या अवगत झाल्या होत्या. त्यामुळे एकूण जेमतेम वीस पंचवीस वेळा ती त्यात झोपली असेल. हळूहळू घड्या घातलेले कपडे, जास्तीच्या उश्या, बाळापासून सुरक्षित ठेवायच्या गोष्टी असं सामान ठेवायला त्या कॉटचा वापर सुरू झाला. एकदा तर विशेष दमणूक झालेली असताना तात्पुरता संन्यास म्हणून मीच त्या कॉट मध्ये जाऊन झोपल्याचं स्मरतं! 'स्मरतं' कसलं, फोटोच काढून ठेवलाय नवऱ्यानं! 

कालांतरानं आमची बदली मुंबईला झाली. तिथे घर कधी मिळेल, केवढं मिळेल ह्या विवंचनेत पडलो. वीतभर बाय टीचभर घरात कॉट नक्कीच ठेवता येणार नव्हती. जड अंतःकरणानं तिचे भाग सुटे करून तिला सामानाबरोबर सन्मानानं मुंबईला पाठवली आणि शेवटी फोटोफिनिश म्हणावं अश्या जेमतेम अचूक वेळेत व्हीटी स्टेशनच्या बाहेर एका नातेवाईकांकडे ती पुढील आयुष्यासाठी सुपूर्द केली. 

पुढच्या बाळंतपणात तिसर्‍या तिमाहीमध्ये अंगड्याटोपड्यांच्याही आधी एक पाळणा शोधून विकत घेण्यात आला हे वेगळे सांगणे नलगे! 

7 comments:

  1. Beautifully written. Brings out the essence of a young mother's life in the Armed Forces at a far-out station.

    ReplyDelete
    Replies
    1. Absolutely !!

      It was all quite frustrating since we couldn't get the daughter to sleep in it as planned, but reading it brought back lovely memories !!

      Thanks

      Delete
  2. वा !अतिशय सुंदर शब्दात व्यक्त झाली आहेस ग!!

    ReplyDelete
  3. Beautifully written !
    अप्रतिम !

    ReplyDelete
    Replies
    1. We are happy that you had a nice time reading the article!

      Delete

WhatsApp हॅक झाले: साध्या सहा अंकी कोड मुळे अनेकांची फसवणूक

  श्रीमती एम . यांच्यासाठी तो एक अगदी नेहमीचा दिवस होता . अचानक त्यांच्या फोनवर WhatsApp चा व्हेरिफिकेशन कोड — सहा अंकी क्रमांक आला . त्यां...