(आयझॅक अॅसिमोव्ह यांच्या कथेचा स्वैर अनुवाद - अश्विनी मराठे)
आयझॅक अॅसिमोव्ह हा जगप्रसिद्ध विज्ञानकथालेखक होता. त्याच्या विज्ञानसाहित्यात भविष्यकाळात घडू शकणार्या घटनांचा, प्रगतीचा विविध अंगांनी वेध घेतलेला आपल्याला दिसतो. व्हिडिओ कॉन्फरन्स यासारखी संकल्पना प्रत्यक्षात येण्यापूर्वी कित्येक वर्षे त्याने ती कथेतून मांडली होती. सुप्रसिद्ध 'रोबॉटिक्सच्या 3 नियमांचा' तो जनक आहे.
१९५१ साली त्याने लिहिलेली एक कथा - 'The fun they had'. ह्या कथेत २१५७ साली शाळा व शिक्षक कसे असतील याचे भाकीत सापडते. (मात्र ते भाकीत त्याच्या अंदाजापेक्षा लौकर खरे ठरणार असे वाटू लागले आहे!) २१५७ साली दोन लहान मुलांना माळ्यात एक जुनं पुस्तक सापडतं आणि मग काय घडतं ते ह्या कथेत सांगितलं आहे.
मला जे उत्तम शिक्षक लाभले आणि आजही जे शिक्षक उत्तम काम करत आहेत त्यांच्याबद्दल, माझ्या शाळेबद्दल कृतज्ञतेच्या भावनेतून आजच्या शिक्षकदिनी ह्या छोट्याश्या कथेचा स्वैर अनुवाद तुमच्यापुढे ठेवत आहे.
(ROBOT ह्या शब्दाचा योग्य उच्चार रोबॉट असा आहे.)
कित्ती कित्ती मज्जा!
मार्जीनं त्या रात्री तिच्या डायरीमध्ये त्या घटनेबद्दल लिहिलं. १७ मे २१५७ च्या पानावर तिनं लिहिलं, "आज टॉमीला एक खरंखुरं पुस्तक सापडलं!"
हे पुस्तक अगदी जुनंपुराणं होतं. तिचे आजोबा एकदा म्हणाले होते, की ते लहान असताना त्यांचे आजोबा त्यांना म्हणाले होते, की एके काळी सगळ्या गोष्टी म्हणे कागदावर छापल्या जात असत!
मार्जी आणि टॉमी दोघांनी त्या पुस्तकाची सुरकुतलेली पिवळसर पानं उलटायला सुरुवात केली. स्क्रीनवरचे शब्द सरकतात तसे त्या पानांवरचे शब्द हलत नव्हते, अगदी एका जागी थांबून होते. तसे ते वाचायला गंमतच वाटत होती. आणि मघाशी वाचलेलं पान त्यांनी जेव्हा पुन्हा उघडलं ना, तेव्हा त्या पानावरचे मघाचे शब्द अजूनही जिथल्या तिथेच होते!
"हॅः," टॉमी म्हणाला, "मग काय उपयोग? एकदा हे पुस्तक वाचून झालं की मग ते फेकूनच द्यावं लागेल ना! याउलट आपल्या टीव्हीच्या स्क्रीनवर लाखो पुस्तकं असतील आणि आणखी कितीतरी पुस्तकांसाठी त्यावर जागासुद्धा असेल. माझा स्क्रीन काही मी टाकून देणार नाही!"
"मीही नाही!" मार्जी म्हणाली. मार्जी 11 वर्षांची होती. टॉमी 13 वर्षांचा होता आणि त्याने मार्जीहून जास्त टेले-पुस्तकं पाहिली होती. "हे पुस्तक तुला कुठे मिळालं?" तिनं विचारलं.
"माझ्या घरी.." त्यानं पुस्तकातून डोकं वर न काढताच वरच्या दिशेनं बोट दाखवलं आणि म्हणाला, "माळ्यावर!"
"कशाबद्दल आहे ते?"
"शाळेबद्दल!"
"शाळेबद्दल? त्यात काय आहे लिहिण्यासारखं? मला मुळीच नाही आवडत शाळा!"
मार्जीला पहिल्यापासूनच शाळा फार आवडत नसे, आणि अलीकडे तर अगदीच आवडेनाशी झाली होती. रोबॉट शिक्षकाने अलीकडे तिला भूगोलाच्या चाचण्यांवर चाचण्या दिल्या होत्या आणि तिला त्यांमध्ये कमी कमी मार्क मिळत चालले होते. शेवटी तिच्या आईनं हताशपणे डोकं हलवत काऊंटी इन्स्पेक्टरला बोलावणं धाडलं होतं.
काऊंटी इन्स्पेक्टर हा एक बुटका, गोलमटोल, लालबुंद चेहर्याचा माणूस होता. त्याच्याकडे खूप तारा आणि डायल्सनी भरलेली हत्यारांची पेटी होती. मार्जीकडे बघून तो हसला आणि त्याने तिला एक सफरचंद दिलं. मग तो रोबॉट शिक्षकाला खोलून दुरुस्त करायला बसला. आता त्याला हा शिक्षक परत नीट जोडता येऊच नये, असंच मार्जीला वाटलं. पण कसचं काय.. त्याला ते जमलंच आणि तासाभरात त्यानं तिचा रोबॉट शिक्षक पुन्हा जोडून दिला - मोठ्ठा, काळा आणि कुरूप. आणि त्याचबरोबर अभ्यासाचे धडे आणि चाचणी प्रश्नपत्रिका ज्यावर दिसायच्या तो त्याचा मोठ्ठा स्क्रीन सुद्धा. मार्जीची सर्वात नावडती गोष्ट होती ती म्हणजे, गृहपाठ आणि परीक्षेचे पेपर टाकण्यासाठी असलेली फट. मार्जी सहा वर्षाची असताना तिला एक पंच-कोड शिकावा लागला होता. आता तो कोड वापरून उत्तरं पंच केली आणि त्या फटीतून आत सरकवली की तिचा शिक्षक झटकन तो पेपर तपासून मार्क देत असे.
इन्स्पेक्टरचं काम झालं. त्याने हसून मार्जीच्या डोक्यावर थोपटलं. मग तो तिच्या आईला म्हणाला, “तिची चूक नाहिये, मिसेस जोन्स. मला वाटतं, भूगोलाच्या भागाचं चाक जरा जास्त वेगात फिरत होतं. होतं असं कधीकधी. आता मी त्याचा वेग कमी करून अकरा वर्षांच्या पातळीला योग्य इतका केला आहे. खरं सांगायचं तर, हिची प्रगती अगदी समाधानकारक आहे!” असं म्हणून त्याने पुनः मार्जीच्या डोक्यावर थोपटलं.
मार्जीची निराशा झाली. तिला वाटलं होतं, तिच्या शिक्षकाला इन्स्पेक्टरनं घेऊनच जावं. मागे एकदा टॉमीच्या रोबॉट शिक्षकाचा इतिहासाचा डेटा जेव्हा सगळाच डिलीट झाला होता, तेव्हा त्याच्या शिक्षकाला ते दुरुस्तीसाठी सबंध महिनाभर घेऊन गेले होते.
आणि म्हणूनच तिनं आत्ता टॉमी ला विचारलं होतं - “शाळेबद्दल कुणी का लिहील?”
टॉमीनं जराश्या तुच्छतेनं तिच्याकडे पाहिलं. “ए बावळट, ही काही आपल्यासारखी शाळा नाहिये काही! शेकडो वर्षांपूर्वी असत असे तशी जुन्या प्रकारची शाळा आहे ही!” आणि मग काळजीपूर्वक उच्चार करत, ऐटीत तो म्हणाला, “म्हणजे शतकांपूर्वी!”
मार्जी खट्टू झाली. “इतक्या वर्षांपूर्वी कश्या शाळा होत्या मला कसं माहीत असणार?” थोडा वेळ ती त्याच्या खांद्यावरून डोकावून पुस्तक वाचत राहिली आणि मग म्हणाली, “बघ, त्यांनाही शिक्षक होता!”
“होता ना, पण तो आपल्या शिक्षकासारखा रोबॉट शिक्षक नव्हता काही.. तो माणूस होता!”
“माणूस? माणूस कसा शिक्षक असू शकेल?”
“म्हणजे, तो माणूस मुलांमुलींना विषय समजावून सांगत असे, गृहपाठ देत असे आणि प्रश्न विचारत असे.”
“माणूस एवढा हुशार नसतो काही!” मार्जीला खात्री होती.
“असतो की! माझे बाबा माझ्या शिक्षकाएवढेच हुशार आहेत…!”
“शक्यच नाही. शिक्षकाइतकी माहिती एखाद्या माणसाला असणं शक्यच नाही.”
“माझ्या बाबांना जवळजवळ माझ्या शिक्षकाएवढीच माहिती आहे. लावतेस पैज?” टॉमी म्हणाला.
हे आव्हान स्वीकारायला मार्जीची तयारी नव्हती. ती म्हणाली,”पण माझ्या घरी कुणी अनोळखी माणूस मला शिकवायला आलेलं मला नाही आवडणार!”
त्यावर टॉमी जोरजोरात हसू लागला. “ किती ढ आहेस ग मार्जी! ते शिक्षक मुलांच्या घरात राहत नसत काही.. त्यांच्यासाठी एक स्वतंत्र इमारत असे, आणि सगळी मुलं शिकायला तिथे जात असत.”
“आणि सगळी मुलं एकसारख्याच गोष्टी शिकत असत?” “हो! म्हणजे, एका वयाची असलेली सगळीच मुलं!”
“पण माझी आई म्हणते की ज्या मुलाला किंवा मुलीला शिकवायचंय त्याच्या लेव्हल प्रमाणे शिक्षक ॲडजस्ट करावा लागतो आणि प्रत्येक मुलाला वेगवेगळ्या पद्धतीनं शिकवावं लागतं.”
“ हो, पण त्या काळी तसं करत नसत. तुला आवडत नसेल तर नको ना वाचूस पुस्तक!” टॉमीने स्पष्टच सांगितलं.
“आवडत नाहिये असं कुठे म्हटलं मी?” मार्जी चटकन म्हणाली. त्या गमतीदार शाळांविषयी तिला वाचायचं होतं. पुन्हा दोघं पुस्तकात डोकं घालून बसली. त्या दोघांचं अर्धं पुस्तकसुद्धा अजून वाचून झालं नव्हतं, इतक्यात मार्जीच्या आईनं हाक मारली, “मार्जी! शाळेची वेळ झाली!”
मार्जीनं पुस्तकातून डोकं वर काढलं- “ए इतक्यात नको ना ग आई!”
“आत्ता, लगेच!” आई म्हणाली. “आणि टॉमीच्याही शाळेची वेळ झाली असेल आता!”
मार्जी टॉमीला म्हणाली, “ए टॉमी, शाळा संपल्यावर आपण दोघं पुन्हा हे पुस्तक वाचू या?”
“बघू!” तो बेफिकिरीनं म्हणाला आणि ते जुनं, मळकं पुस्तक काखोटीला मारून शीळ घालत निघून गेला.
मार्जी शाळेच्या वर्गात गेली. तिच्या झोपायच्या खोलीच्या शेजारचीच खोली होती ती. तिथे रोबॉट शिक्षक चालू केलेला होता आणि तिची वाट पाहत होता. शनिवार आणि रविवार सोडले तर दररोज ह्याच वेळी तिची शाळा असे, कारण रोज ठराविक वेळी शिकल्यानं अभ्यास नीट होतो असं तिच्या आईचं म्हणणं होतं.
रोबॉटचा स्क्रीन चालू झालेला होता आणि त्यावर अक्षरं उमटली होती - “आजच्या गणिताच्या धड्याचा विषय आहे - साध्या अपूर्णांकांची बेरीज. कालच्या गृहापाठाचे कागद योग्य फटीतून आत सरकव!”
एक सुस्कारा सोडून मार्जीनं गृहपाठ फटीतून आत सरकवला. आजोबांचे आजोबा लहान असतानाच्या त्यांच्या त्या जुन्या शाळेचा विचार अजून तिच्या डोक्यात होता. सगळ्या गावातली मुलं हसत खिदळत, आरडाओरडा करत शाळेच्या पटांगणात येत, एकत्र वर्गात बसत आणि शाळा सुटली की मिळून घरी जात. त्या सगळ्यांना शाळेत एकसारखेच धडे शिकवत असत, त्यामुळे ती एकमेकांना अभ्यासात मदत करू शकत आणि त्याबद्दल गप्पा सुद्धा मारू शकत!
आणि त्यांना शिकवायला माणसं असत..!
इकडे, रोबॉट शिक्षकाच्या स्क्रीनवर अक्षरं उमटली होती - “१/२ आणि १/४ यांची बेरीज..”
मार्जीचं तिकडे लक्षच नव्हतं. पूर्वीच्या मुलांना शाळा किती आवडत असेल, हा विचार तिच्या डोक्यात होता.
.......त्यांनी कित्ती कित्ती मज्जा केली असेल, ह्याचाच ती विचार करत होती.
Some more stories on the main page of the blog !!
https://polarispilot.blogspot.com/2025/07/by-blue-baby-cot-by-ashwini-marathe.html
गोष्ट तर गोड आहेच, पण तू केलेलं स्वैर भाषांतर फारच बहारदार! छान ओघवती भाषा आहे तुझी. त्यामुळे 'भाषांतरा'मध्ये काही वेळा होतं, तसं कुठेच अडखळायला झालं नाही!
ReplyDeleteइतकी मोठी शाबासकी! I'm honoured!
Delete- From Ashwini
गोष्ट छान आहे ...गंमत येते आहे वाचायला ...... भाषांतरातल्या सहजतेमुळे अजून मजा वाढली
ReplyDeleteधन्यवाद!
Deleteमस्त गोष्ट आणि तुझा अनुवादही. माझ्या नातवाला वाचायला देते,त्याला आवडेल.
ReplyDeleteहो, नक्कीच!
Deleteअगं कित्ती गोड गोष्ट आणि भारी अनुवाद.. दोघं बहिणभाऊ, त्यांचा शिक्षक आणि ते खरं खरं पुस्तक डोळ्यांपुढे आलं... खरंच आपल्या पिढीने फार फार मज्जा केली शाळेत...!!
ReplyDeleteहो ग...
Deleteसुंदर कथा आणि त्याचं त्याहून सुंदर भाषांतर. पुढचा काळ कसा असणार आहे याची झलक इतक्या छोट्या कथेतून फार यथार्थपणे दाखवली गेली आहे. मुलांच्याच काय प्रत्येकाच्याच भविष्यातल्या आयुष्याचं रूप किती वेगळं होत जाणार आहे याची कल्पनाही करवत नाही. त्यामुळे लेखकाने त्या काळात आपल्याला डोकावायला लावून त्याची एक छान झलक दाखवली आहे. खूप खूप धन्यवाद अश्विनी ही कथा आमच्यापर्यंत पोहोचवल्याबद्दल.
ReplyDeleteधन्यवाद!
Deleteअनुवाद छान झालाआहे...भाषा क्लिष्ट नाहीये ...आणिमुख्य म्हणजे मूळ लेखक किती पुढच्या काळाचा विचार करून गोष्ट लिहित होता हे ही समजले. मस्त... असेच आणखी अनुवाद इथे वाचायला आवडतील.
ReplyDeleteधन्यवाद दादा! नक्की प्रयत्न करेन!
ReplyDeleteCongratulations.An excellent translation.In Marathi you have managed the nuances and expressions extremely deftly.It reads like the original and despite being science fiction you have managed the language very well.Often some terms are difficult but you have done a very good job.So proud of you.
ReplyDeleteThank you so much! Means a lot to me!
Deleteसुंदर कथा...अश्विनी कथेचे रूपांतर तर सुंदरच ..तुझीच कथा वाटते.आपल्या पिढीनं खरंच खूप मज्जाच मज्जा केली. लेखकाचे भाकित खरं ठरू नये पण आताचा शैक्षणिक प्रवास त्याच दिशेनं वाटचाल करतोय.
ReplyDeleteThank you!
ReplyDeleteअप्रतिम अनुवाद! गोष्ट फार छान आहे.... तुझा अनुवाद वाचून सगळे चित्र डोळ्यासमोर उभे राहिले. मस्त!
ReplyDeleteThank you!
Delete