प्रत्येकाने इच्छापत्र का तयार करावे? – इच्छापत्र म्हणजे काय, ते का आवश्यक आहे आणि कोणासाठी आहे?
इच्छापत्र म्हणजे काय? ते कोणासाठी आवश्यक आहे? इच्छापत्र तयार केल्याने आपल्या कुटुंबाला कोणते फायदे होतात? या सहा भागांच्या लेखमालेच्या पहिल्या भागात जाणून घ्या इच्छापत्राची मूलभूत माहिती.
अनेकजण इच्छापत्र करण्याचा विषय जाणीवपूर्वक टाळतात. काहींना तो गुंतागुंतीचा वाटतो, तर काहींना त्याची गरज फक्त वयोवृद्ध किंवा श्रीमंत लोकांनाच असते असे वाटते. प्रत्यक्षात, आपल्या कुटुंबाचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी आणि आपल्या पश्चात त्यांना अनावश्यक कायदेशीर अडचणींपासून वाचवण्यासाठी इच्छापत्र तयार करणे हा प्रत्येकाने घ्यावयाच्या सर्वात महत्त्वाच्या निर्णयांपैकी एक आहे.
हा इच्छापत्रावरील सहा भागांच्या लेखमालेतील पहिला लेख आहे. या लेखमालेत इच्छापत्र म्हणजे काय, ते का आवश्यक आहे, त्यात कोणत्या गोष्टींचा समावेश असतो, ते कसे लिहावे, इच्छापत्र नसल्यास काय अडचणी येऊ शकतात, लिव्हिंग विल, उत्तराधिकाराचे कायदे आणि शेवटी MS Word मधील इच्छापत्राचा नमुना याविषयी माहिती घेणार आहोत.
या लेखमालेच्या शेवटच्या (भाग ६) मध्ये MS Word मधील इच्छापत्राचा नमुना दिला जाईल. त्याची लिंक येथे दिली जाईल.
ही लेखमाला केवळ माहितीपर असून ती कायदेशीर सल्ला नाही. तुमच्या विशिष्ट परिस्थितीसाठी कृपया तुमच्या वकिलांचा सल्ला घ्या.
या लेखमालेबद्दल एक छोटीशी नोंद
मराठीत "मृत्युपत्र" हा शब्द पारंपरिक कायदेशीर संज्ञा म्हणून वापरला जातो. मात्र या लेखमालेत आपण "इच्छापत्र" हा शब्द वापरणार आहोत. दोन्ही शब्दांचा कायदेशीर अर्थ एकच असला तरी "इच्छापत्र" हा शब्द अधिक सकारात्मक, आपुलकीचा आणि कमी धाकदायक वाटतो. त्यामुळे संपूर्ण लेखमालेत आपण "इच्छापत्र" हीच संज्ञा वापरणार आहोत.
इच्छापत्र म्हणजे काय?
इच्छापत्र (Will) हा एक कायदेशीर दस्तऐवज आहे ज्यामध्ये तुमच्या निधनानंतर तुमची मालमत्ता (Estate) आणि संपत्ती (Assets) कोणाला, किती आणि कोणत्या पद्धतीने मिळावी हे स्पष्टपणे नमूद केले जाते.
· तुमच्या इच्छा स्पष्टपणे व्यक्त होतात.
· तुमच्या प्रियजनांना कमीत कमी कागदपत्रांची पूर्तता करावी लागते.
· मालमत्तेचे हस्तांतरण सुरळीत होते आणि वाद टाळता येतात.
इच्छापत्र कोणी तयार करावे?
सोपे उत्तर म्हणजे – ज्याच्याकडे कोणत्याही प्रकारची मालमत्ता आहे त्या प्रत्येकाने.
· तरुण कमावते: उत्पन्न सुरू होताच इच्छापत्र करण्याचा विचार करावा. भविष्यात तुम्ही इतरांच्या इच्छापत्रातील लाभार्थी (Beneficiary) असू शकता आणि त्याचाही विचार करता येतो.
· ज्येष्ठ नागरिक व निवृत्त व्यक्ती: तुमच्या पश्चात कुटुंबाला मालमत्ता सुरळीत मिळावी म्हणून विलंब न करता इच्छापत्र तयार करावे.
· गृहिणी: पती, आई-वडील किंवा सासरच्या कुटुंबाकडून भविष्यात मिळणाऱ्या मालमत्तेचाही विचार इच्छापत्रात करणे आवश्यक आहे.
मी भारतीय नौदलात हेलिकॉप्टर वैमानिक (Naval Aviator) म्हणून कार्यरत असताना प्रत्येक नवीन पोस्टिंगच्या वेळी युनिटमध्ये इच्छापत्र सादर करणे आवश्यक असे. त्याच वेळी मला प्रथम इच्छापत्राचे महत्त्व प्रत्यक्ष अनुभवातून समजले.
इच्छापत्र का तयार करावे?
इच्छापत्र तयार करण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे तुमच्या पश्चात तुमच्या मालमत्तेचे काय आणि कसे व्हावे, याचा निर्णय तुम्ही स्वतः घेऊ शकता.
· इच्छापत्र नसेल, तर हा निर्णय तुमच्या इच्छेनुसार नव्हे तर कायद्यानुसार घेतला जातो. त्यामुळे अनावश्यक कागदपत्रे, विलंब, अतिरिक्त खर्च आणि कौटुंबिक वाद निर्माण होऊ शकतात.
· तुमच्या कुटुंबाला अनावश्यक कायदेशीर आणि आर्थिक अडचणींपासून संरक्षण मिळते.
· अल्पवयीन मुलांसाठी पालक किंवा संरक्षक (Guardian) नियुक्त करता येतो.
· ई-मेल, ऑनलाईन खाती, डिजिटल गुंतवणुका, प्रकाशन हक्क (Copyrights) आणि पेटंट (Patents) यांसारख्या डिजिटल मालमत्तेबाबत स्पष्ट सूचना देता येतात.
· मालमत्तेचे वाटप स्पष्ट असल्यामुळे भविष्यातील वाद टाळता येतात.
इच्छापत्र नसल्यास तुमच्या मालमत्तेचे वाटप तुमच्या इच्छेनुसार न होता उत्तराधिकाराच्या कायद्यांनुसार (Succession Laws) केले जाते. त्यामुळे अनेक कायदेशीर वारसांच्या स्वाक्षऱ्या आवश्यक होऊ शकतात आणि कागदपत्रांची संख्या वाढते. उदाहरणार्थ, पती-पत्नीच्या संयुक्त मालकीच्या घरावर तुमच्या निधनानंतर परिस्थितीनुसार पत्नी, मुले आणि आई यांचाही कायदेशीर हक्क निर्माण होऊ शकतो. याबद्दल पुढील भागांमध्ये अधिक माहिती पाहू.
इच्छापत्र तयार करणे अवघड असते का?
अजिबात नाही. साध्या कागदावर स्वतःच्या हस्ताक्षरातही इच्छापत्र लिहिता येते. मात्र ते कायदेशीरदृष्ट्या अधिक सक्षम ठरण्यासाठी पुढील बाबी लक्षात ठेवा:
· दोन साक्षीदारांच्या उपस्थितीत स्वाक्षरी करा. साक्षीदार लाभार्थी (Beneficiary) नसावेत.
· दोन्ही साक्षीदारांनी तुम्ही त्यांच्या उपस्थितीत स्वाक्षरी केल्याची नोंद म्हणून स्वाक्षरी करावी.
· विशेषतः ज्येष्ठ नागरिक किंवा वैद्यकीय समस्या असलेल्या व्यक्तींनी मानसिक क्षमता (Mental Fitness) असल्याचे डॉक्टरांचे प्रमाणपत्र घेणे हितावह आहे.
यासाठी क्लिष्ट भाषा, महागडे वकील किंवा मोठी कायदेशीर कागदपत्रे आवश्यक नसतात. तुमची इच्छा स्पष्ट आणि कायदेशीरदृष्ट्या योग्य प्रकारे नोंदवलेली असणे हेच सर्वात महत्त्वाचे आहे.
इच्छापत्र न करण्याची सर्वसाधारण कारणे
इच्छापत्र तयार करणे सोपे असूनही अनेकजण विविध कारणांनी ते पुढे ढकलतात. त्यामागील काही सामान्य गैरसमज आणि त्यामागील वास्तव पुढीलप्रमाणे आहे.
“इच्छापत्र कर म्हणजे मी लवकर मरणार असे तुला वाटते का?”
मृत्यूबद्दल बोलणे अनेकांना अस्वस्थ वाटते. परंतु वास्तव स्वीकारून आपल्या पश्चात कुटुंबाला होणाऱ्या त्रासाचा विचार करणे हीच खरी जबाबदारी आहे.
“माझ्या मृत्यूनंतर सर्व मालमत्ता आपोआप माझ्या जोडीदारालाच मिळेल.”
हे नेहमीच खरे नसते. प्रत्येक धर्माचे उत्तराधिकाराचे कायदे वेगवेगळे असतात. उदाहरणार्थ, हिंदू उत्तराधिकार कायद्यानुसार पत्नी, मुले आणि आई यांनाही कायदेशीर वारसाहक्क असू शकतो.
“हे खूप खर्चिक आणि किचकट आहे.”
इच्छापत्र लिहिण्यास काहीही खर्च येत नाही. नोंदणी ऐच्छिक असून तिचा खर्चही तुलनेने कमी असतो. इच्छापत्र तयार करण्यासाठी वकील असणे बंधनकारक नाही.
“मी काही सोबत घेऊन जाणार नाही.”
हे खरे असले तरी इच्छापत्र नसेल तर तुमच्या कुटुंबामागे अनावश्यक गोंधळ आणि ताण राहू शकतो.
“माझी मुले इच्छापत्रासाठी आग्रह करतात म्हणजे त्यांचा डोळा माझ्या संपत्तीवर आहे.”
इच्छापत्रामुळे तुमची मालमत्तेवरील मालकी कमी होत नाही. ते तुमच्या निधनानंतरच अंमलात येते.
“घर मुलांच्या नावावर केले तर ते मला बाहेर काढतील.”
इच्छापत्र आणि जिवंतपणी मालकी हस्तांतरित करणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. आयुष्यभरात घराची मालकी हस्तांतरित करण्यापूर्वी अत्यंत विचार करा.
“मला काही होणार नाही.”
जीवन अनिश्चित आहे. इच्छापत्र म्हणजे निराशावाद नव्हे, तर जबाबदार नियोजन.
“इच्छापत्र स्टॅम्प पेपरवरच किंवा नोंदणीकृतच असावे.”
ही चुकीची समजूत आहे. साध्या कागदावर लिहिलेले इच्छापत्रही वैध असते. नोंदणी ऐच्छिक असली तरी शिफारस केली जाते.
ही सर्व कारणे केवळ विलंब घडवतात. त्याचा त्रास मात्र शेवटी आपल्या प्रियजनांनाच सहन करावा लागतो.
शेवटचा विचार
इच्छापत्र हे संपत्तीबद्दल नसून जबाबदारीबद्दल आहे. तुम्ही तरुण असाल किंवा ज्येष्ठ, नोकरीत असाल किंवा व्यवसायात, गृहिणी असाल किंवा उद्योजक—तुमच्या कुटुंबासाठी स्पष्टता ठेवणे ही तुमची जबाबदारी आहे.
आजच पहिले पाऊल उचला. इच्छापत्र तयार करणे तुम्हाला वाटते त्यापेक्षा खूप सोपे आहे.
पुढील भाग
लेखमाला – भाग २ (६ पैकी)
इच्छापत्र तयार करताना समजून घ्यावयाच्या महत्त्वाच्या संज्ञा – नामनिर्देशन (Nomination), नामनिर्देशित व्यक्ती (Nominee) आणि लाभार्थी (Beneficiary).
पुढील ब्लॉगची लिंक: https://polarispilot.blogspot.com/2025/09/key-terms-in-making-will-nominations.html
