मालमत्तेच्याही पलीकडे – गंभीर स्थितीतील रुग्णांना आवश्यक असे लिव्हिंग विल, अॅडव्हान्स मेडिकल डायरेक्टिव्ह (वैद्यकीय इच्छापत्र)
मागील भागांमध्ये आपण इच्छापत्राचे महत्त्व जाणून घेतले. इच्छापत्र कसे तयार करावे आणि इच्छापत्र
नसल्यास आपल्या कुटुंबाला कोणत्या अडचणींना सामोरे जावे लागते हेसुद्धा पाहिले. परंतु भविष्यासाठी नियोजन करताना आणखी एक महत्त्वाचा विषय आहे तो म्हणजे तुमच्या आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यातील वैद्यकीय
उपचारांबाबतचे तुम्ही आत्ताच विचारपूर्वक
घेतलेले निर्णय.
लिंक "विल केलंच नाही तर काय होईल??"
- जाणून घ्यायचं आहे? वाचाच मग.. (इच्छापत्र भाग ४)
लिव्हिंग विल (Advance Medical Directive) म्हणजे काय?
भविष्यात तुम्ही गंभीर आजाराने ग्रस्त झालात आणि उपचारांबाबत काही
इच्छा व्यक्त करण्याची किंवा निर्णय घेण्याच्या स्थितीत नसाल तर अशा परिस्थितीत तुमच्या
नातेवाईकांनाच तुमच्या वतीने महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतात. ते घेताना तुमचा सल्ला
किंवा इच्छा ते विचारू शकत नाहीत. त्यासाठी आधीच- धडधाकट असताना आणि पूर्ण विचारपूर्वक,
कोणते वैद्यकीय उपचार घ्यायचे किंवा टाळायचे याबद्दल स्पष्ट
सूचना तुम्ही लिव्हिंग विल किंवा अॅडव्हान्स मेडिकल डायरेक्टिव्ह मध्ये लिहून ठेवू शकता. यात कोणकोणते मुद्दे
येतात?
·
आजाराच्या अंतिम अवस्थेत व्हेंटिलेटर
किंवा फीडिंग ट्यूबचा वापर करायचा की नाही?
·
बरे होण्याची शक्यता अत्यंत कमी असेल तर येनकेनप्रकारेण तुम्हाला
जिवंत ठेवण्याचा अट्टहास करायचं का नाही?
·
हृदयक्रिया बंद पडल्यास CPR, डिफिब्रिलेशन
या मार्गांनी ती पुन्हा चालू करावी
का नाही?
या सर्व खटाटोपामागील मुख्य उद्देश म्हणजे अशा कठीण प्रसंगी तुमच्या कुटुंबाला तुमच्या इच्छेचा अंदाज बांधत निर्णय घ्यावा लागू नये. त्यासाठी तुम्हीच तुमच्या उपचारांबाबत स्पष्ट सूचना देऊन
ठेवल्यात तर त्यांना निर्णय घेणे सोपे जाईल. तसेच, डॉक्टरांनाही तुमची इच्छा स्पष्टपणे
कागदावर दिसली की शंकेला वाव रहाणार नाही. तुम्हाला दीर्घकाळ
व्हेंटिलेटरवर ठेवू नये, कृत्रिम आहार देऊ नये किंवा आक्रमक उपचार नकोत अशी तुमची इच्छा असेल, तर ते ‘लिव्हिंग विल’मध्ये स्पष्टपणे नमूद करता येते. त्यामुळे कुटुंबीयांवरील मानसिक ताण मोठ्या प्रमाणात
कमी होतो. त्यांच्यात एकवाक्यता नसेल तर तुमची इच्छा प्रमाण
मानून ते त्याप्रमाणे तुमच्या उपचारांबाबत निर्णय घेऊ शकतात. याच विलमध्ये अवयवदान (Organ Donation) किंवा देहदान (Body Donation) याबाबतची इच्छाही
नमूद करता येते.
‘लिव्हिंग विल’चे
महत्त्व - आधुनिक
वैद्यकशास्त्रामुळे रुग्णाला आटोकाट प्रयत्नांनी जिवंत ठेवणे अनेकदा शक्य असते. यामुळे
रुग्णाचे आयुष्य वाढते ही खरे, परंतु अनेकदा त्यात रुग्णाचे हाल होतात आणि अवस्था दयनीय
होते. रुग्णाने शांत चित्ताने, वेळीच आणि पूर्ण विचारांती लिहिलेल्या लिव्हिंग विलमध्ये वैद्यकीय
उपचारांबाबतच्या रुग्णाच्या इच्छा स्पष्ट नोंदवलेल्या असतात. त्यामुळे काही कठोर निर्णय
घेतल्याचा अपराधीपणा रुग्णाच्या कुटुंबीयांच्या मनात रहात नाही किंवा त्यांच्यावर तसा
ठपकासुद्धा येत नाही. जरी त्यांच्यात याबाबत मतभेद असतील तरी तुमची इच्छा त्यांना डावलता
येत नाही.
उदाहरणार्थ, माझ्या एका शस्त्रक्रियेपूर्वी
रुग्णालयात दाखल होतानाच 'Do Not Resuscitate (DNR)' फॉर्मवर मी स्वाक्षरी करून ठेवली होती आणि काही
गुंतागुंत झाल्यास आक्रमक जीवनवर्धक उपचार नकोत, अशी स्पष्ट सूचना दिली होती. त्यामुळे तशी वेळ आली असती
तरी निर्णय घेण्याचे अवघड काम माझ्या कुटुंबावर पडले नसते. अर्थात सुदैवाने तशी वेळच आली नाही.
कायदेशीर
मान्यता -
भारताच्या
सर्वोच्च न्यायालयाने २०१८ मध्ये लिव्हिंग विलला मान्यता दिलेली आहे. सक्रिय
इच्छामरण (Active Euthanasia) मात्र भारतात बेकायदेशीर आहे.
काही उपयुक्त लिंक्स
-
🔴 सर्वोच्च न्यायालयाच्या २०१८ च्या निर्णयावरील लेख (डॉ. निखिल दातार यांच्या याचिकेची माहिती) – येथे क्लिक करा.
🔴 लिव्हिंग विलचे महत्त्व स्पष्ट करणारा BBC वरील लेख –
येथे क्लिक करा.
🔴 मुंबईतील लिव्हिंग विल क्लिनिकविषयी माहिती – येथे क्लिक करा.
🔴 इच्छापत्राचा मसुदा - येथे क्लिक करा.
भाग ६ लौकरच....

No comments:
Post a Comment