प्रत्येकाने इच्छापत्र तयार करणे का गरजेचे आहे? – इच्छापत्र म्हणजे काय, ते का आवश्यक आहे आणि कोणासाठी आहे?
इच्छापत्र म्हणजे काय? ते कोणासाठी आवश्यक आहे? इच्छापत्र तयार केल्याने आपल्या कुटुंबाला कोणते फायदे होतात? हे सर्व या सहा भागांच्या लेखमालेच्या पहिल्या भागात जाणून घ्या.
अनेकजण इच्छापत्र करण्याचा विषय जाणीवपूर्वक टाळतात. काहींना तो गुंतागुंतीचा वाटतो, तर काहींना त्याची गरज फक्त वृद्धांना किंवा श्रीमंत लोकांनाच असते असे वाटते. प्रत्यक्षात, आपल्या कुटुंबाचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी आणि आपल्या पश्चात त्यांना कायदेशीर अडचणी येऊ नयेत म्हणून इच्छापत्र तयार करणे महत्त्वाचे आहे. मी भारतीय नौदलात कार्यरत असताना प्रत्येक नवीन पोस्टिंगच्या वेळी युनिटमध्ये इच्छापत्र सादर करणे आवश्यक असे. त्या वेळी मला प्रथम इच्छापत्राचे महत्त्व समजले.
इच्छापत्रावरील सहा भागांच्या माझ्या लेखमालेतील हा पहिला लेख आहे. या लेखमालेत इच्छापत्र म्हणजे काय, ते का आवश्यक आहे, त्यात कोणत्या गोष्टींचा समावेश असतो, ते कसे लिहावे, इच्छापत्र नसल्यास काय अडचणी येऊ शकतात, लिव्हिंग विल म्हणजे काय, उत्तराधिकाराचे कायदे याविषयी माहिती घेणार आहोत.
या लेखमालेच्या शेवटच्या भागात (भाग ६) इच्छापत्राचा नमुना देत आहे. तो पाहण्यासाठी येथे क्लिक करा. .
सूचना - ही लेखमाला केवळ माहितीपर आहे, कायदेशीर सल्ला नाही.
मराठीतला "मृत्युपत्र" हा शब्द वापरणे अनेकांना नकोसे वाटू शकते. त्यामुळे ह्या लेखमालेत 'मृत्युपत्र' ऐवजी 'इच्छापत्र' हा शब्द वापरलेला आहे.
इच्छापत्र म्हणजे काय?
इच्छापत्र (Will) हा एक कायदेशीर दस्तऐवज आहे. त्यात तुमच्या निधनानंतर तुमची मालमत्ता (Estate) आणि संपत्ती (Assets) कोणाला, किती आणि कोणत्या पद्धतीने मिळावी हे तुम्ही स्पष्टपणे नमूद केलेले असते.
इच्छापत्र केल्याने
· तुमच्या इच्छा स्पष्टपणे व्यक्त होतात.
· तुमच्या प्रियजनांना कमीत कमी कागदपत्रांची पूर्तता करावी लागते.
· मालमत्तेचे हस्तांतरण सुरळीत होते आणि वाद टाळता येतात.
इच्छापत्र कोणी तयार करावे?
थोडक्यात सांगायचे तर, ज्याच्याकडे कोणत्याही प्रकारची मालमत्ता आहे त्या प्रत्येकाने इच्छापत्र करून ठेवावे.
· कमावते तरुण-तरुणी - यांनी नोकरी लागताच इच्छापत्र करण्याबाबत विचार करावा.
· ज्येष्ठ नागरिक व निवृत्त व्यक्ती - ह्यांच्या पश्चात कुटुंबाला मालमत्ता सुलभपणे मिळावी म्हणून विलंब न करता इच्छापत्र तयार करावे.
· गृहिणी - 'मी गृहिणी आहे, मला इच्छापत्राची काय गरज?' असा विचार न करता आपल्या मालकीच्या संपत्तीचे इच्छापत्र करणे गरजेचे आहे. (उदा. स्त्रीधन, घर, बँक अकाऊंट, जॉइंट गुंतवणूक, स्कूटर, चारचाकी इत्यादि.)
आपली अशी समजूत असते की 'मला एकच वारस आहे आणि पती/ पत्नी आहे, तेव्हा मालमत्तेची वाटणी सोपी आहे!' परंतु ते तितकेसे खरे नाही. तुमच्या वारसांना बँक, गृहरचना संस्था, म्यूचुअल फंड इत्यादींकडे त्यांचा हक्क सिद्ध करण्यासाठी एक कायदेशीर कागदपत्र दाखवणे गरजेचे असते आणि ते नसले तर खूप अडचणी येऊ शकतात. इच्छापत्र असेल तर ही यातायात करण्यातून वारसांची सुटका होते.
इच्छापत्र का तयार करावे?
इच्छापत्र तयार करण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे तुमच्या पश्चात तुमच्या मालमत्तेचे काय आणि कसे व्हावे, याचा निर्णय तुम्ही स्वतः घेता आणि तश्या लेखी कायदेशीर सूचना लिहून ठेवता.
· इच्छापत्र नसेल, तर हा निर्णय तुमच्या इच्छेनुसार नव्हे तर कायद्यानुसार घेतला जातो.
· त्यामुळे अनावश्यक कागदपत्रे, विलंब, अतिरिक्त खर्च आणि कौटुंबिक वाद निर्माण होऊ शकतात.
· इच्छापत्राद्वारे अल्पवयीन मुलांसाठी पालक किंवा संरक्षक (Guardian) नियुक्त करता येतो.
· ई-मेल, ऑनलाईन खाती, डिजिटल गुंतवणुका, प्रकाशन हक्क (Copyrights) आणि पेटंट (Patents) यांसारख्या डिजिटल मालमत्तेबाबत स्पष्ट सूचना देता येतात.
· मालमत्तेचे वाटप स्पष्ट असल्यामुळे कौटुंबिक वाद टाळता येतात.
इच्छापत्र नसल्यास तुमच्या मालमत्तेचे वाटप उत्तराधिकाराच्या कायद्यांनुसार (Succession Laws) केले जाते. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी सर्व वारसांची उपस्थिती आणि स्वाक्षरी यांची गरज पडू शकते. उदाहरणार्थ, पती-पत्नीच्या संयुक्त मालकीच्या घरावर तुमच्या निधनानंतर (तुमचे इच्छापत्र नसेल तर) परिस्थितीनुसार पत्नी, मुले आणि आई यांचाही कायदेशीर हक्क निर्माण होऊ शकतो. त्यामुळे त्या घराची विक्री, भाडेकरार इत्यादि करणे अत्यंत क्लिष्ट होऊन बसते. याबद्दल पुढील भागांमध्ये अधिक माहिती पाहू.
इच्छापत्र तयार करणे अवघड असते का?
अजिबात नाही. साध्या कागदावर स्वतःच्या हस्ताक्षरातही इच्छापत्र लिहिता येते. मात्र ते कायदेशीर ठरण्यासाठी पुढील बाबी लक्षात ठेवा:
· दोन साक्षीदारांच्या उपस्थितीत स्वाक्षरी करा. तुमच्या इच्छापत्रातील लाभार्थी (Beneficiary) साक्षीदार म्हणून चालत नाहीत.
· तुम्ही साक्षीदारांच्या उपस्थितीत स्वाक्षरी केल्यानंतर त्यांनीही त्यावर स्वाक्षरी करणे आवश्यक आहे.
· ज्येष्ठ नागरिक किंवा वैद्यकीय समस्या असलेल्या व्यक्तींनी मानसिकदृष्ट्या सक्षम (Mentally Fit) असल्याचे डॉक्टरांचे प्रमाणपत्र घेतल्याने पुढे शंकेला वाव राहणार नाही. आपले फॅमिली डॉक्टर असे प्रमाणपत्र देऊ शकतात.
इच्छापत्रासाठी क्लिष्ट भाषा, महागडे वकील किंवा मोठी कायदेशीर कागदपत्रे यांची गरज नसते. तुमची इच्छा स्पष्ट शब्दांत आणि कायदेशीरदृष्ट्या योग्य प्रकारे नोंदवलेली असणे हेच सर्वात महत्त्वाचे आहे.
आपण इच्छापत्र करणे का टाळतो?
इच्छापत्र तयार करणे सोपे असूनही अनेकजण विविध कारणांनी ते पुढे ढकलतात. त्यामागील काही सबबी आणि त्यांचे खंडन पुढीलप्रमाणे -
“इच्छापत्र कर म्हणताय म्हणजे मी लवकर मरणार आहे असे तुम्हाला वाटते का?”
स्वतःच्या मृत्यूबद्दल बोलणे, विचार करणे अनेकांना अप्रिय वाटते. परंतु प्रत्येकाला मृत्यू अटळ आहे हे वास्तव स्वीकारून आपल्या पश्चात कुटुंबीयांना त्रास होऊ नये असे करणे ही आपली जबाबदारी आहे.
“माझ्या मृत्यूनंतर सर्व मालमत्ता आपोआप माझ्या पतीलाच/पत्नीलाच मिळेल.”
हे नेहमीच खरे नसते. प्रत्येक धर्माचे उत्तराधिकाराचे कायदे वेगवेगळे असतात. उदाहरणार्थ, हिंदू उत्तराधिकार कायद्यानुसार पत्नी, मुले आणि आई यांनाही कायदेशीर वारसाहक्क असतो.
“इच्छापत्र करणे हे खूप खर्चिक आणि किचकट आहे.”
इच्छापत्र लिहिण्यास काहीही खर्च येत नाही. त्याची कायदेशीर नोंदणी करणे (registration) ऐच्छिक असून नोंदणीचा खर्च माफक असतो. इच्छापत्र तयार करण्यासाठी वकील नेमणे बंधनकारक नाही.
“मी काही माझी मालमत्ता स्वर्गात बरोबर घेऊन जाणार नाही!”
हे अगदी खरे आहे आणि त्यासाठीच इच्छापत्र केले पाहिजे. ते नसेल तर तुमच्यामागे तुमच्या कुटुंबाला तुमची मालमत्ता त्यांच्या नावावर करून मिळण्याची प्रक्रिया अत्यंत त्रासदायक ठरते.
“माझी मुले इच्छापत्रासाठी आग्रह करत आहेत म्हणजे त्यांचा माझ्या संपत्तीवर डोळा आहे.”
इच्छापत्रामुळे तुमची मालमत्तेवरील मालकी संपत नाही. तुमची मालमत्ता तुम्ही जिवंत असेपर्यन्त तुमचीच राहते. दुसऱ्या कुणाचाही त्यावर हक्क नसतो.
“घर मुलांच्या नावावर केले तर ती मला घराबाहेर काढतील.”
इच्छापत्र करून घराची व्यवस्था लावणे आणि जिवंतपणीच घराची मालकी कुणालाही हस्तांतरित करणे या दोन अगदी वेगळ्या गोष्टी आहेत. तुमच्या हयातीत तुमच्या घराची मालकी कुणालाही देऊन न टाकणे हेच इष्ट.
“मला काही होणार नाही.”
जीवन अनिश्चित आहे. इच्छापत्र करणे म्हणजे निराशावाद नव्हे, तर भविष्याचे जबाबदारीने केलेले नियोजन होय.
“इच्छापत्र स्टॅम्प पेपरवरच लिहावे लागते आणि त्याची नोंदणी करावीच लागते.”
ही चुकीची समजूत आहे. साध्या कागदावर लिहिलेले इच्छापत्रही वैध असते. नोंदणी करणे ऐच्छिक असते पण ती करणे फायद्याचे ठरते.
वरील सर्व सबबींमुळे इच्छापत्र करणे लांबणीवर पडते आणि कधीकधी राहूनच जाते. त्याचा त्रास मात्र शेवटी आपल्या प्रियजनांनाच सहन करावा लागतो.
जाता जाता...
इच्छापत्र करणे ही आपली आपल्या कुटुंबाप्रति जबाबदारी आहे. त्यांना आपल्या पश्चात त्रास होऊ नये, कोर्टात खेटे घालायला लागू नयेत आणि आपल्या इच्छेनुसार आपल्या संपत्तीची वाटणी सुलभपणे व्हावी यासाठी इच्छापत्र गरजेचे आहे. तुम्ही तरुण असाल किंवा ज्येष्ठ, नोकरी किंवा व्यवसाय करत असाल किंवा निवृत्त असाल, गृहिणी असाल —तुम्ही इच्छापत्र करणे जरुरीचे आहे आणि ते तुम्हाला वाटते त्यापेक्षा खूप सोपे आहे.
लेखमालेच्या पुढील भागात (भाग दुसरा) --
इच्छापत्र तयार करताना समजून घ्यावयाच्या महत्त्वाच्या संज्ञा – नामनिर्देशन (Nomination), नामनिर्देशित व्यक्ती (Nominee) आणि लाभार्थी (Beneficiary).
तुमच्या सूचना आणि अभिप्राय खाली जरूर लिहा. त्यासाठी ब्लॉगर अकाऊंट असण्याची गरज नसते.
इच्छापत्र भाग २ - इच्छापत्रातील महत्त्वाच्या संज्ञा – नामनिर्देशन, नॉमिनी आणि लाभार्थी

Very very useful information
ReplyDeleteThank you very much, Asmita for your words of encouragement. I'm glad the information is reaching more people who will benefit from taking the right steps.
DeleteThanku,very important information about important topic..🙏🏻
ReplyDeleteThank you for the appreciation! Do pass this on to more people!
Deleteखूपच छान, सोप्प आणि समजेल अशा भाषेत लिहिले आहेस यशोदन. मला पण वाचायला आवडतील तुझे blogs. 🙏
ReplyDeleteधन्यवाद!
Deleteवरचा अभिप्राय माझा आहे.
ReplyDeleteI am grateful to you for a very lucid explanation.
Delete